माझी ही उत्तरं शोधण्याची प्रक्रिया जरी परिचयाची असली तरी ती सोसायला सोपी नव्हे. पण याचा भौतिक जगात काहीही उपयोग नसतो कारण माझ्या उमेदीचा काळ निघून गेलेला असतो, आपलं मनाचं समाधान.. इतकंच. नुसत्या मनाच्या समाधानावर पुन्हा एकदा उमेदीने शोध सुरु करणं म्हणजे तसं कठीणच! तेव्हा माझ्यातच एक नवीन मूक संघर्ष सुरु होतो, एका बाजूला माझं मन आणि एका बाजूला माझं शरीर उभं असतं. या दोघांचा मेल घालणं म्हणजे महाकठीण! म्हणूनच कदाचित मी या मन मिळवणीच्या फंदात पडत नाही. सगळ्या वस्तूंच्या प्रतिमा तयार होतात.. आयुष्य एक मृगजळ वाटायला लागतं. आणि चुकून मनाने या मृगजळावर विश्वास ठेवायला सुरुवात केली की मात्र शरीर अगदी थकून जातं. स्वप्न आणि सत्य यांच्या वाटा म्हणजे चकाव्यांच एक जाळंच..
तो थकला होता थोडा
तो मुकला होता थोडा
स्वप्न पाहता पाहता
तो चुकला होता थोडा
सांजवेळी त्याने कधी
हातात आणला होता
जाईचा गोंडस गजरा
तो सुकला होता थोडा
तो टाकून आला होता
रक्ताचे करून वंगण
तळाशी होता पटल जो
तो झिजला होता थोडा
आणतसे तो चंद्रही
नात्यांच्या खिडकीपाशी
पुनवेला ग्रहणावरती
तो झुकला होता थोडा
तो चालत होता जेथे
वाटाच फसव्या होत्या
चकव्यांचे होते राज्य
तो चकला होता थोडा
तृष्णेला कंठ फुटावा
मृगजळे उदंड व्हावी
भासांना गिळण्यासाठी
वाकला होता थोडा
त्या मृगजळात होते
प्रतिबिंब ओळखीचे
गहिवरून आले मला अन्
तो हसला होता थोडा
ते सत्य प्रतिबिंब होते
की विस्मृतीत गेलो ‘मी’ ?
कोड्यांचे टाकून जाळे
तो बसला होता थोडा
सावलीत माझ्या मी
एकांत शोधत होतो
माझ्या मूढ प्रश्नांना
तो थकला होता थोडा
Rolla, MO (US)