नशीब … नशीब ही अशीच एक विनोदी गोष्ट .. ज्या ज्या गोष्टींना आपल्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार मिळालेला आहे त्यांच्या पैकी एक ! नशीब कुबेराला एका क्षणात भिकारी, एका भिकाऱ्याला धनी एव्हढंच काय पण एका अनोळखी माणसाला महात्मा बनवू शकतं. लोकांचे समज हा माणसाला काही अंशी उपयोगी पडणारी गोष्ट जरी असली तरी काही जणांना ते पटत नाही. पण कधी कधी त्यांचाही अगदीच नाईलाज होवून जातो. ह्यालाही नशिबच म्हणावं लागेल. अशाच एका महात्म्याची गोष्ट … न जाणो जगात अशा किती आख्यायिका असतील !
काही वर्षांपूर्वी .. म्हणतात
गावाच्या वेशीवर
कोणी फाटका माणूस आला होता
चालून चालून तो फार थकला होता
कोणी म्हणे भिकारी होता
कोणी म्हणे आजारी होता
जुन्या घोंगडीवर अंग टाकून होता
भगवे कापड पांघरून होता
क्वचित कोणी त्याला
एखादी भाकरी देत असे
बोलत नसे कुणाशी रात्रीचा
देवळापाशी जातसे
थोडा कण्हत असे
हात जोडून कधी रडत ही असे
दूर पारावर आधी म्हणे
कोणाकोणाला भुते दिसायची
लहान लहान ती मुलांना उचलून न्यायची
तो त्या पारावर रहायला गेला
लोकांना तो कोणी साधू वाटायचा
दिवस रात्र स्वतःत हरवलेला
तो भगव्या कापडात दिसायचा
असेच दिवस गेले
पंचक्रोशीत त्याचे नाव झाले
आता अधून मधून लोक फुले ही वाहू लागले
त्याला असह्य होई सारे ..
पण मूकपण पदरी पडलेले
पळून जाता ही येत नव्हते
शरीर होते पूर्ण थकलेले
… आणि दिवसेंदिवस फुलामाळांच्या
फक्त राशी वाढत गेल्या
हाच तो पार
तपस्वी सारखा वस्तीपासून दूर बसलेला होता
आणि काही दगडांवर शेंदूर फासलेला होता