देवाकडे केलेलं मागणं म्हणजे सरकारी साहेबाला केलेला अर्जच! सगळ्यांना वाटतं की त्यांच मागणं महत्वाचं आहे.. स्वार्थाचा चष्मा थोडा वेळ बाजूला केला तर गीतेतला एक दृष्टांत दिसू लागतो, तो म्हणजे प्रत्येक जीवाचा जन्म एका निश्चित कर्मासाठी झालेला आहे. हे कर्म झाले नाही तर मोक्ष मिळत नाही या भीतीपोटी माणूस आत्महत्या टाळत असतो. याच भीतीपोटी तो आपापले एक ध्येय ठरवतो आणि तेच त्याचे कर्म होते. तरीही जगात दुःख आहेच , तरीही जगात अश्रू आहेत यातना आहेत. कारण माणसाने ठरवलेले त्याचे तथाकथीत कर्म आणि त्याच्या जन्माचे सार्थक यात बराच फरक असतो..
पृथ्वीवर जन्मल्या मातीचा
नंतर चिखल झालेला असतो
आणि त्यातच पवित्र कमळाचे मूळ रुतलेले असते
आशीर्वाद नभाचा कोसळतो
शतजन्मांची तहान जणू शमते
तहानेमध्येच कोठे एक गाव वाहून गेलेले असते
देवावर भक्ती असावी माणसाची
नव्हे असलीच पाहिजे नाहीतर
दोन गोड शब्दांमुळे साऱ्यांचे ‘देव’ झाले असते
रक्ताच्या रंगात फरक नसला
तरी जखमांमध्ये फरक आहेना
फरक हा नसता तर सारे धन्वंतरी झाले असते
आरंभ हाच अंत हे गणित
मरण पाहिजे पुढच्या जन्मासाठी
नाहीतर कोणी यांच्या चक्रात अडकले नसते
वासनेची नखे गर्भात मिळाली नव्हती
तो गर्भ जळायला हवा होता
निदान त्या मृत्यूचे तरी ‘सार्थक’ झाले असते !
Rolla MO, (US)