माझ्या आयुष्याचे एक एक टप्पे पार करत असताना मला बरेचदा अनेक प्रश्न पडतात. दिवसा मन आपापल्या कामात व्यस्त असतं त्यामुळे हे प्रश्न पडत नाही. पण जशी जशी संध्याकाळ जाऊन रात्र येऊ लागते तसतसे हे प्रश्न उजळत जातात. आणि प्रश्न रात्र नेहमी घेऊन येते. मला नेहमी गम्मत वाटते हे प्रश्न रात्रीच का पडतात. हळू हळू ही रात्र मला एका खोडसाळ खट्याळ मुली सारखी वाटू लागलेली आहे जी झोपू देत नाही, स्वस्थ बसू देत नाही, स्वतः ही शांत बसत नाही आणि एक सारखी प्रश्न विचारत रहाते ज्यांची उत्तरं माझ्याकडे नसतात ! तरीही रोज रात्र येते रोज प्रश्न आणते .. आणि माझी झोप घालवत असते .. मला तिची खरच गम्मत वाटते !
मला झोप येत नसली की, रात्रीची मला थोडी गम्मतच वाटते
ती येताना रोज नवीन प्रश्न, आपल्या ओच्यात सावरत आणते
थोडी वेडी थोडी वाकडी असते, तिची वाट ठरलेली असते
पदरावर तिच्या स्वप्नांची, नवी नक्षी भरलेली असते
डोळे मिटण्याचे नाटक करतो मी, ती तशीच बसून रहाते
पानांची सळसळ करते, खिडकीवर हसून जाते
मला कंटाळा आला जरी, ती कंटाळत नाही
पण तिच्या प्रश्नांना मात्र, उत्तरं मिळत नाही
ती नुसती वाहत जाते, वेळेचं भान नसतं
ती फुंकर घालत जाते, पेटलेलं रान असतं
त्याच्या बघून ज्वाळा, ती दूर दूर पळते
बंद मुठीत सकाळी, चंद्राची राख उरते
दिवसा मी जागा असतो, रात्रीच पापणी मिटते
कुणास ठाऊक तिला सांगतो कोण ? ती बाजूला येऊन बसते
मला झोप येत नसली की रात्रीची मला थोडी गम्मतच वाटते !
sundar lihilays ! 🙂
Thank you 🙂