संगमाच्या नशिबी होत्या
देवळांच्या अनंत राशी
अश्रूत दिसे कोणाला गंगा
वाळूत दिसते काशी
घरटेही अमर कोणाचे
त्याचाही वैरी वारा
ते गळले तरी निरंतर
चिमणीही शोधते चारा
पापण्यांवर तुझ्या कधीचा
तो दाटून आहे जलधी
तू भिजवून टाक स्वतःला
ऋतू बदलण्या आधी
एकेक अक्षरासाठी वेड्या
रडशील किती असाच
प्रत्येक नव्या पानाला
फांदीचा असतो जाच
स्वप्नातल्या बांध खांबांना
गळल्या पिसांचे पूल
सिद्धार्थाच्या अवतीभवती
असतेच पांढरे फूल