पाचोळा

दिवा लावला की प्रकाश पडणार ! एवढ्या साध्या आणि सुलभ व्याख्येने वादळ आणि त्याच्या परिणामांचे मुल्यांकन करता येत नाही. मनातल्या वादळांची तर गोष्टच निराळी ! मनातलं वादळ म्हणजे फक्त सोसाट्याने वाहणारे विचार किंवा बेभान बरसणाऱ्या भावना नसतात. ते वादळ म्हणजे जीवनरूपी अखंड नदीचा प्रवाह बदलणारा, नैसर्गिक बांध असतो. प्रवाहात वाहताना मनाला दिशांचे भान रहात नाही. त्याला फक्त वाहण्याचीच ओढ लागलेली असते. प्रवाह या वादळामुळे अनेक वळणे घेत जातो. खडकांचे, वनांचे, दऱ्या खोऱ्याचे अडथळे पार करत धावत रहातो. कोणी याला जीवनाचं भरकटणं म्हटलं तर मन उर्मट पणे त्याला प्रवाहाची दिशा असं ठणकावून सांगतं आणि कधी कधी माणूस प्रवाहाशी शर्यत करता करता स्वतः पासून फार दूर एका विवक्षित पण तरीही असुरक्षित जागी जावून बसतो. या जागेत आणि बहिस्थ जगात फक्त एक काचेची भिंत असते. ‘तो’ बोलायचा थांबलेला असतो आणि आपण त्याला विचारलं जरी काही, आपला आवाज त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही.. त्याचं आयुष्य अगदी पाचोळ्यासारख वाटू लागतं..

आयुष्याच्या क्षितिजावर , कधी संध्याकाळी
कधीतरी तो ,  मला काहीतरी शोधताना दिसतो
मी त्याला विचारत नाही , असच काहीस तो हरवून बसलाय

कधी पहाटे तो देवाजवळ ,
एकटाच काहीतरी मागत असतो ,
वर्षामागून वर्ष गेली तरीही तो रडत असतो
असं खूप जवळच काही गमावून बसलाय ,
पण मी त्याला विचारत नाही
असच काहीसं तो हरवून बसलाय

काही जण म्हणतात असं , काही म्हणतात तसं
पण तो मात्र गोष्टी सांगत फिरतो ,
सुख – दुखाच्या , मनातल्या गावातल्या ..
पण आयुष्याचे शब्द वेचता वेचता
इतिहासाच फाटलेल पान होऊन बसलाय
मी त्याला विचारत नाही
असच काहीसं तो हरवून बसलाय

मला वाईट वाटायचं ..
जेव्हा तो एकटाच बसतो कधी नदीकाठी
थोडा देवावरही रागावतो ,
मग समजलं की, आयुष्याची कागदी होडी
तो त्या नदीतच सोडून बसलाय
मी तरी त्याला काय विचारू ,
असच काहीसं तो हरवून बसलाय

असं म्हणतात त्याने ऐकलं, जेव्हा सगळे बोलत होते
तो बोलायला गेला तेव्हा वेळच  ऐकत नव्हती ,
मी ऐकायला गेलो, पण तो शुष्क डोळ्यांमध्ये
सारे शब्द ,सारे स्वर गिळून बसलाय ,
मी त्याला विचारात नाही ,
असच काहीसं तो हरवून बसलाय

त्या झाडावर यायची कधी फुलं
अन सावलीही होती त्याची ,
आपल्या कर्तृत्वाची गाणीही
ताठ मानेने गायचा तो कधी ,
वाऱ्याशी झुंजता झुंजता
तो फक्त ‘पाचोळा’ होऊन बसलाय ,
मी तरी त्याला काय विचारणार ,
असच काहीसं तो हरवून बसलाय

आजही तो दिसतो ..
मान खाली घालून चालत असतो ..
मी स्वतालाच विचारतो
जग त्याला विसरलय की,
तो ‘ पाचोळा ‘ सगळ्या रानाला वाळीत टाकून बसलाय ?
आता मात्र त्याला विचारावस वाटत नाही ,
असच काहीसं तो हरवून बसलाय..

Rolla, MO (US)

Disclaimer & Policy

Spread the love

1 thought on “पाचोळा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *