सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .. असं थोरा मोठ्यांचं बोलणं आपण वाचतो , ऐकतो. ज्याच्यासाठी सुख-दुःखातला फरक नष्ट झाला तो स्थितप्रज्ञ हेही आपण मानलेलं आहे. पण स्थितप्रज्ञही स्वतःला आपण सुख-दुःखाला समान मानतो , असं सांगून स्थितप्रज्ञतेच एका अर्थी सुखच उपभोगत असतो ! मग हा फरक कुठे नष्ट झाला ?! याच मुख्य कारण म्हणजे सुख आणि दुःख हे मनाच्या स्वार्थाचे सफल अथवा निष्फल होण्याचे परिणाम आहेत आणि मनावर संयम म्हणजे फक्त या स्वर्थांवर ताबा ! स्वार्थासारखीच अजून एक प्रश्नांकित वस्तू म्हणजे पाप-पुण्य भावना. मनाची ठाम समजूत असते की सुख वाटल्याने पुण्य मिळतं पण कुणाचं दुःख आपल्या पदरात घेतल्यानेही पुण्य मिळतं हे मन अगदी सोयीस्कररित्या विसरत. सहसा कुठल्याच मनाला दुःख नको असतं आणि म्हणूनच काही मने हे दुःख आपल्यात सामावण्यासाठी पुढे येतात. त्या मनांनाही सुख हवं असतं पण त्यांचं प्रारब्ध वेगळंच काही लिहित असतं. अमृत कोणाला नको असतं ?! पण अमृताबरोबर जे विष येत ते प्यायला कोणी एखादा नीलकंठ लागतोचना ! या अशा मनांना तो का हसत नाही ? हे विचारणं थोडसं कृतघ्नी वाटू लागतं…
अमृताच्या धारेवर
सगळ्यांचाच डोळा होता,
पण विषावर स्वामित्व सांगणारा
तो निळकंठ एकटा होता !
हसण्याला अमृत मानले ज्यांनी
तो भ्रम होता त्यांचा ,
आनंदाश्रूंनी न्हाहून गेलेला
तो काळ वेगळा होता
हसता हसता आज
गातो ज्यांची गाणी
मिरवतो पालख्याही ,
तो सिद्धार्थ ‘ मी ‘ पण
दु : खावर सोडून होता
मला विचारलंत अगदी सहजपणे ,
का मी हसत नाही ?
विचारा हेच त्या आईला
जिचा तान्हा त्या खडीवर झोपून होता
काहींना चाळशी मिळते
रंगीबेरंगी, नाना ऋतूंचे
मी ती लावली स्वताला
त्यात फक्त गडद रंग होता
मलाही हसायचंय
जर ते रंग कुणी पुसले तर …
Rolla, MO (US)