कालाय तस्मै नमः

देवाच मिळालेलं दान म्हणजे आपल ‘आयुष्य’ ! खर तर एखाद्या कळीला एका लहान मुलीने जपावे तेवढ आपण आपल्या आयुष्याला जपत असतो. या कळीने आपल्याच बरोबर वाढावे फुलावे ही स्वार्थी इच्छा म्हणजे मानवाच्या जगण्याचा आधारस्तंभ आहे . आपल्याच आयुष्याच्या मोहात आपण इतके रुतून जातो की त्याला लागणारा प्रत्येक धक्का प्रत्येक ठेच मनावर जबरदस्त घाव करून जाते. आणि जखमांच्या गर्भात प्रतिशोध दडलेला असतो. कधी या जखमांना औषध मिळत … काळाच्या रूपात. पण जेव्हा जखम फक्त ठणकत रहाते तेव्हाही आपण या काळाला दोष देतो . मग हा काळ , एका साधूचा वेश घेतलेला ‘भोंदू’ बनून समोर येतो जो आपल्याला फक्त फसवत असतो !… आणि तरीही शेवटी त्याच्याच पायावर डोक टेकायला लागत हाही दैवदुर्विलास नाही का ?!

Picture
कालाय तस्मै नमः

अनंताचा, तू प्रवासी निरंतराचा
जाणून सर्व काही ऐहीकाचा अभोगी ,
स्वतः च स्वतः ची महती सांगणारा
मूक पावलांचा महाजोगी

लोकांच म्हणण आहे हे ,
पाहिलं मीही तुला तसं वागताना ,
आणि आज दिसलास मला
तू माझ्या प्रारब्धावर हसताना

ना जाणो रक्त किती स्वप्नांचे
तुझ्या कमंडलुत असेल !
कित्येक मनांचे भस्म
तुझ्या अंगावर साचत असेल !

सांगत फिरतोस तू
तुला बंध ना नात्यांचे ना भावनांचे ,
ना सुतक दुःखांचे
ना सोयर कुणाच्या आनंदाचे

मी जाणले आहे तुझे खोटेपण
तुझ्या स्मितामागचे क्रूर आभास ,
होय क्रूरच म्हणीन मी, नाहीतर ..
कोण्या बुडत्यावर तू हसला नसतास

भगवंताने दिली तुला चक्र ,
आमचे आयुष्य हाकण्यासाठी
कधी उतरून बघ त्यावरून मागे ,
जीव चिरडले आहेत तरी किती

खेळ तुझा नेहमीचा, लांब हाताने फटके
तर आशीर्वाद थोटक्या हाताने
तू लादलेल्या पाप – पुण्यांचे मोजमाप
मात्र तुझ्या जपमाळेने ?!

तू साधू कसला ? तू तर ढोंगी ..
जखडलेस त्यांना, जे धावले स्वप्नांमागे
आणि केलेस त्यांना, तुझ्या होमात स्वाहा
तरीही त्यांच्या चितांवर रडणारे
म्हणत राहतात
कालाय तस्मै नमः … कालाय तस्मै नमः !

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *