माझ्या भावनाच्या काही विचित्र अवस्था आहेत.. आधी प्रश्न, मग त्याचं उत्तरं शोधण्याची धडपड, मग थोडे मी आणि थोडे लोकांनी उभे केलेले अडथळे, त्यावर येणारा राग, फार राग येऊन होणारा निरुपाय, निरुपायाने ओढवलेली शांतता आणि कालांतराने प्रश्नच निष्फळ वाटू लागल्यामुळे येणारं करुणात्मक हसू आणि एकदा एखाद्या गोष्टीच हसं झालं की त्याकडे मी त्रयस्थ पणे बघतो आणि खरा प्रश्न समोर येतो की ‘ते’ काय होतं? मी कशाचा पाठलाग करत होतो? आईनस्टाइन म्हणून गेलाय की उत्तरं शोधण्यासाठी आधी प्रश्न बरोबर माहित असणं गरजेच आहे. उशिरा का होईना मी प्रश्न बरोबर मांडतोच आणि एखाद्या विजेसारखं उत्तर समोर येतं.. जणू वहीत दडवून ठेवलेल्या काळ्यांचा एके दिवशी अचानक सुवास दरवळावा!
आभाळ ‘जे’ धरणीला
विचारत नसतं
पावसाच्या थेंबांना
‘जे ‘माहित नसतं
पृथ्वीला गवसणारे
इंद्रधनुष्य ‘जे’ सांगत नसतं
चांदण ओंजळीत घेणाऱ्या
रातराणीला ‘जे’ ठाऊक नसतं
कुठल्या ओढीने जाणाऱ्या
नदीत ‘जे’ वहात नसतं
वसंत फुलल्या वेलींवर
‘जे’ उमलत नसतं
फूल फुलपाखराला
‘जे’ मागत नसतं
वाट पाहणाऱ्या डोळ्यांना
‘जे’ दिसत नसतं
विरहाच्या अश्रूंना ‘जे’
कळत नसतं
सांगून कधी ‘जे’
ऐकू येत नसतं
कधी न सांगताही
‘जे’ उमगत असतं
भावनाच्या पंखांना कधीच
‘या’च बंधन नसतं
ज्यांना ‘हे’ कळणार नाही
त्यांना कधीच पटत नसतं
तू दिलेल्या कळ्या
जपून ठेवल्यात मी अजूनही
इतकी वर्ष झाली
पण त्यांच्या सुगंधाला
याच भय नसतं
काही गोष्टींना खरच “वय” नसतं!
Rolla, MO (US)