आयुष्य एक प्रवास आहे हे आपल्याला माहित असले तरी सुद्धा या प्रवासात आपण अनेक परिक्रमा पार करत असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्पा खर तर एका परिक्रमेचा शेवट आणि दुसऱ्या परिक्रमेची सुरुवात असते. या परिक्रमा करत असताना आपण वेगवेगळ्या भूमिका घेत असतो. माणसाच्या मनाला त्याची भूमिका माहित असली की प्रवास सुकर वाटतो. पण कधी कधी आपली भूमिका निश्चित नसली की मन विचलित होतं … आणि दिशेचे अंदाज जेव्हा चुकतात मन एखाद्या वैराग्याची .. संन्यासाची भूमिका घेतं आणि ही वाट अशीच जाते असं स्वतःला पटवून देतो आणि चालत रहातो. संन्यासाची भूमिका घेणे आणि सन्यासी होणे यात मुख्य फरक असा की मन सन्यासी पण एक टप्प्याला सोडणार असतं. त्यामुळे वाटेवर अंधार पडला की त्याला कायमचे सन्यासी होण्याची भीती वाटू लागते ..
दिशांचे चुकून अंश सन्यासी चालत येतो
श्वासांची करून माळ अंधार मागत येतो
चंद्राचे प्रतिबिंब त्याच्या
कमंडलुत येते
ही वाट अशीच जाते … ही वाट अशीच जाते
घर सोडले दूर चालतो आपल्याच वाटे
भविष्य अंधार आता अन भूतकाळ काटे
धृवांचे करून डोळे
वर्तमान त्यात झुलते
ही वाट अशीच जाते … ही वाट अशीच जाते
वाटेवरच्या पाचोळ्याचा वणवा होत आहे
जळून जळून माझाही देखावा होत आहे
ज्वाळांत आठवणींच्या
मनाची राख होते
ही वाट अशीच जाते … ही वाट अशीच जाते
झोपेतून उठलो की स्वप्नांचा रंग उतरतो
आता मात्र चालताना मी रात्रीला घाबरतो
स्वप्नांच्या मोहाचे आता
निर्माल्य असेच होते
ही वाट अशीच जाते … ही वाट अशीच जाते
वळणे ही मला विचारी , ही वाट जाते कुठे
चोरून रात्र दिवसाला, अर्घ्य वाहते कुठे
हवा ओंजळीची
निष्पर्ण फांदीवर येते
ही वाट अशीच जाते … ही वाट अशीच जाते!