या माझ्या चालण्या, थांबण्या अडखळण्याच्या परिक्रमेतील अजून एक पडाव म्हणजे फकिराचं कोंदण लाभलेलं क्षणिक वैराग्य. खरं तर वैराग्याचा अर्थ फार मोठा आहे. त्याच्या अनंत पसरलेल्या पाउलखुणांवर वर्षानुवर्ष साचत आलेल्या अध्यात्मिक भस्माला माझ्या सारख्या सामान्य माणसाचा उसासा काय हलवणार? संसारावर, आयुष्यावर प्रेम करायचं असेल तर एकदा तरी वैराग्याची भावना दाटून यावी लागते एकदा तरी फकिराचे फाटके घोंगडे अंगावार घ्यावे लागते! थोडसं बुचकळ्यात टाकणार विधान आहे पण एक मजेची गोष्ट आहे की माणसाचं मन जे त्याच्या जवळ नाही नेमकं तेच मागतो. मला जेव्हा कळत नाही की मला नक्की काय हवंय तेव्हा मी हे फकीरपण अंगावर घेतो आणि एकदा फकीर होऊन वावरायला लागलो की आपल्याच आयुष्याकडे त्रयस्थ पणे बघण्याची ताकद मला मिळते. तेव्हा मला जाणीव होते की माझ्याकडे नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींच मोल फार मोठं आहे.. थोडा वेळ मला ते फकिराच घोंगडं घट्ट धरून ठेवावसं वाटतं. कारण माझ्या मनाला माहित आहे हे फकीरपण सुद्धा माझ्याकडे कायमच रहाणार नाहीये!
माळरानी भटकतो मी
गळी रुद्राक्ष घालतो मी
पायी काटे असो वा पाणी ,
अनंत चालतो मी ..
जायचे कोठे माहित नाही
ना वाटांचे ज्ञान आहे ,
क्षितिजावर घर माझे
एवढेच जाणतो मी
पांघरतो उन्हाला, कधी
खेळतो चांदण्यात ,
सखी सोबती माझी
सावलीला मानतो मी
वेळेचे भान नाही
नात्यांचे बंध नाही ,
आयुष्य पावलांच्या
खुणांवर मांडतो मी
का चालतो असा मी
मलाच उमगत नाही ,
कल्लोळल्या मनाशी
सदैव भांडतो मी
कधी गाव लागला कोठे
दिसतात ‘माणसे’ थोडी ,
खोट्या मुखवट्याना
रस्त्यात सांडतो मी
कोणी म्हणे मी वेडा
कोणी म्हणे अडाणी ,
शब्द गिळले किती
हे कधी न स्मरतो मी
आहे जसा मी
आहे तसा मी
कुणी म्हणावे काही , स्वतः ला
“फकीर” म्हणवतो मी !
Rolla, MO (US)