आता हे तर नक्की झालंय की रात्र येतेच आणि ती आली की लवकर जात नाही. मी रात्रीला जा तर म्हणू शकत नाही. पण तिच्या येण्याने मनाच्या शांत पटलांवर काही तरंग उठतात हे मात्र नक्की. आणि हे तरंग कधी कुठल्या गोष्टी स्वतः बरोबर वाहून आणतील याचा एम नाही. या गोष्टींवर हसावं की रडावं याचा विचार सुरु होतो आणि बऱ्याच वेळाने ध्यानात येतं की आपण झोपायचंच विसरून गेलोय. एक खरं की तिच्यावर चीडण्याचा ओरडण्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे आता मी फक्त एवढंच म्हणू शकतो एवढंच मागू शकतो की तू ये पण ..
तिची चाहूल येते आणि
मृद्गंध दरवळतो सारा
पापण्यांची उघडता दारे
आसमंत उजळतो सारा
ती रात्रीच फक्त येते
खडबडून उठतो वारा
लाटांना आणि उसळत्या
आलिंगन दे किनारा
डोळ्यासमोर दिसतो
शुक्राचा गोंडस तारा
तेथेच असतो चंद्र
विरहाने मिणमिणणारा
स्वप्नावर दाटून येतो
दवबिंदुचा जणू पारा
आता मी नाही, झोपही नाही, फक्त हा नजारा !
” तू रात्रीची पैंजण घालून येऊ नकोस मला झोप येत नाही ”
.. एवढंच तर मी मागितलं होतं ना ?!