रात्रीने चालवलेल्या या खेळामुळे मात्र आता संध्याकाळ होऊ लागली की मला थोडं दडपण येतं. संध्याकाळी वाटतं की सगळ्यापासून लांब लांब जावं, सगळे संपर्क तोडावेत काही बोलू नये फक्त चालत राहावं. वाट मिळेल तिथे जावं पण अशा वेळीही जायचं कुठे ? .. ही वाट जाणार कुठे ? असे प्रश्न पडतातच. रोजची माझी ही वाटहीन मुशाफिरी बघितली की मलाच जाणवतं की आपल्याला दिशाच नाहीये .. खरं तर ती आधीही नाव्हती आत्ताही नाही !
सांजवेळी तो विजनवासी होतो
भरकटल्या वाटांचा प्रवासी होतो
सांडत जातो स्वतःचे रंग काही
दिशा कालही नव्हती.. आजही नाही !
अव्यक्त भावनांची गर्द वाट होते
अबोल अक्षरांची धुंद लाट येते
आणि पुसटसे आता शब्द काही
दिशा कालही नव्हती.. आजही नाही !
बेधुंद मनांच्या संगमाकाठी
एक गाव होते स्वप्नांसाठी
आता पैलही नाही पैलतीरही नाही
दिशा कालही नव्हती .. आजही नाही !