हे वीरांनो!
चौकटी तोडा, सत्यसूर्य ढगांच्या आड गेला आहे
कवाडे उघडा, कुरुक्षेत्रवरती अभिमन्यू मेला आहे!
ज्यांना नीतिचे भग्नावशेष उचलायचे त्यांनी उचला
सत्वाच्या मंदिरातील देव दरोडेखोरांनी नेला आहे..
अधर्मी, सत्तापिपासू आणि रक्तपिपासू कौरवांनी पांडवांचे मनोबल तोडण्यासाठी, त्यांना नमवण्यासाठी अभिमन्यूला युद्धाच्या नियमांविरूद्ध घेरून मारले. कदाचित कुरुक्षेत्रवरती अभिमन्यूचे पार्थिव पाहून भगवान श्री कृष्ण बहुदा असंच काही म्हटले असतील. पांडवांना दु:खाने वेढले होते आणि भगवान श्रीकृष्णाचे उद्दिष्ट सुख – दु:खाच्या पलीकडे धर्म स्थापना हे होते. त्यामुळे या दुर्दैवी आणि दुःखद घटनेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा होता. ऐकताना आणि वाचताना अत्यंत विचित्र वाटेल पण अभिमन्यूची निर्दयी हत्या झाली नसती तर पांडवांनी धर्मयुद्ध जिंकणे कठीण होते. एका अर्थी बघायला गेले तर अभिमन्यूचा मृत्यु धर्म स्थापनेसाठी महत्त्वाचा होता!
पांडवांना एका बाजूला अभिमन्यूचा निष्प्राण जीव दिसत होता. सगळ्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. अर्जुनाने जयद्रथाला मारण्याची शपथ घेतली होती आणि भगवान श्रीकृष्णाला कुरुक्षेत्राच्या दुसऱ्या बाजूला उभे अजेय द्रोणाचार्य, अमर कृपाचार्य, अभेद्य कवच कुंडले जन्मतःच लाभलेला कर्ण, आणि बलशाली दुर्योधन दिसत होते. अर्जुनाची शपथ भावनिक आवेगातून आलेली होती पण श्रीकृष्णाची रणनीती धर्म स्थापनेकडे यत्किंचितही दुर्लक्ष करण्यास तयार नव्हती. भगवंताला एक गोष्ट निश्चित माहित होती की कौरवांनी युद्धाचे नियम तोडले आहेत आता या रणांगणात कोणतेही नियम पाळण्याला पांडव बाध्य नाहीत!
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर समाजाच्या मनावर तथाकथित समाजसुधारकांनी आणि नेत्यांनी लादलेल्या समाजवादाचा आणि विरुद्ध न्यायाचा ज्वर इतका जास्त झाला आहे की, लोक धर्मभ्रष्ट आणि दुष्ट कौरवांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे सोडून साक्षात भगवान श्रीकृष्णाला आणि अर्जुनाला अपराधी ठरवून मोकळे झाले आहेत. काही लोकांच्या बुद्धीची किंवा येते जेव्हा ते अधर्मी लोकांनी केलेल्या कृत्यांची कारणे (justification) देत देत आयुष्य घालवतात. याची परिणीती ही की भारतीयांना ना महाभारताचे ज्ञान आहे ना धर्माचे. पटत नसेल तर खालील वाक्ये कोणालाही ऐकवा आणि विचारा हे योग्य आहेत का?
१. द्रोणाचार्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी युधिष्ठिर अर्धसत्य बोलला
२. कर्णाचे चाक रुतलेले असताना आणि तो निःशस्त्र जमिनीवर असताना त्याच्यावर अर्जुनाने बाण सोडला
३. गदायुद्धात श्रीकृष्णाने भीमाला दुर्योधनाच्या कमरेखाली मारणे सुचवले
बहुतांशी लोक विचार करून अयोग्य म्हणतील! किमान योग्य म्हणायला कचरतील.. याचे कारण वर नमूद केल्याप्रमाणे, तथाकथित समाजसुधारकांनी मोठ्या प्रयत्नाने आपल्या इतिहासाबद्दल निर्माण केलेली उदासीनता! किमान मोरोपंतांनी रचलेले कर्ण-कृष्ण संवाद “रथचक्र उद्धरू दे” हे काव्य वाचले असते तरीही मनात शंका उत्पन्न जाई नसती.
केवळ आणि केवळ पूर्वाश्रमीच्या भाजप समर्थकांना जे नुकतेच देवाभाऊ वर आणि भाजपच्या राजकीय डावपेचांवर नाराज होऊन दूर गेले आहेत, त्यांच्यासाठी हे नमनाला घडाभर तेल! कारण त्यांना कौरवांशी लढताना भगवान श्रीकृष्णाने केलेली कूटनीती दिसते आहे पण अधर्मींनी निर्घृण हत्या केलेला अभिमन्यू दिसत नाहीये.
काही क्षणांसाठी श्रीकृष्णाकडे अवतार म्हणून न बघता एक रणनीतीकार (strategist) म्हणून पहिले तर एक गोष्ट निश्चित आहे की श्रीकृष्ण अत्यंत नशीबवान होता. पांडवांनी कधीही (म्हणजे कधीही) श्रीकृष्णाच्या रणनीतीवर शंका उत्पन्न केली नाही, अंमल बजावणी करताना प्रति प्रश्न केला नाही आणि कधीही श्रीकृष्णाची साथ सोडली नाही! याला म्हणतात निष्ठा. तरीही माझ्या मनाला हे पटणं अवघड जातं की, पांडवांच्या मनात कधीच प्रश्न आले नसतील. खुद्द युधिष्ठिर जो धर्मराज होता. त्याला देखील “नरो वा कुंजरो वा” म्हणताना आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाला “निःशस्त्र कर्णाला मारताना” नक्कीच अनंत प्रश्नांनी वेढले असणार. ही त्यांची परीक्षा होती, ही कसोटी होती. जिथे नीति आणि धर्म यांचे द्वंद्व घडत होते. आणि त्यांनी धर्माची बाजू निवडली!
आता काही म्हणतील आपण देवाभाऊ आणि श्रीकृष्ण यांची तुलना करत आहोत का? याचे उत्तर वरील परिच्छेदातील पहिल्या वाक्यात दिलेले आहे. आणखीन एक उत्तम उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुद्धात अमेरिका आणि रशिया या विरुद्ध विचारसरणीच्या देशांनी नाझींच्या विरोधात केलेली युती. कमल म्हणजे परकीयांनी ते करून दाखवलं जे आपल्यांनी वाचलं देखील नाही! असो, तो विषय अलाहिदा.. आपल्याला आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, कचेरीतील लोकांना आपले मत पटवून देताना नाकेनऊ येतात आणि इथे आपण अशा माणसावर शंका घेत आहोत ज्याने दोन मोठ्या नेत्यांना आपले पक्ष सोडण्याचे पटवून दिले! थोडा याचाही विचार केला गेला पाहिजे.
आज वस्तुस्थिती ही आहे की ही भाजप समर्थकांची परीक्षा आहे. दशकानुदशके नीति पाळून विरोधकांच्या खुर्च्यांखेरीज तुम्हाला काहीच मिळाले नाही. सत्तेविना पुरुषार्थ नाही हे तर सत्यच आहे. कोणीही आकड्यांचे गणित मांडेल आणि तुमच्या हक्काचे राज्य हिसकावून घेईल. म्हणून म्हणतो ही परीक्षा भाजप समर्थकांची आहे. कुरुक्षेत्र सजले आहे, अभिमन्यू मेला आहे आणि कृष्ण तुमच्याकडे बघत आहे! काय कराल?
ता. क.
दोन दशकांपूर्वी देखील असे कुरुक्षेत्र घडले होते, तेव्हा देखील सत्ता लोलुप लोकांकडून अभिमन्यू मारला गेला होता, ते ही एकदा नव्हे दोनदा. आणि तरीही पांडवांना मानसिक बळ गोळा करता आले नव्हती. कै. वाजपेयींना आजूबाजूच्या लोकांच्या अयोग्य मागण्या देखील मान्य कराव्या लागल्या होत्या. इतके सगळे होऊन शेवटी २००४ मध्ये समर्थकांनी श्रीकृष्णाकडे दुर्लक्ष केले आणि कच खाल्लीच व पांडवांना वाऱ्यावर सोडले. याची परिणीती अशी झाली की भाजप आणि देशाला देखील १० वर्षांच्या वनवासाला सामोरे जावे लागले. भाजप समर्थकांना २००४ ते २०१४ ची आठवण करून देणं गरजेचं आहे.
इतकेच कशाला केवळ आमच्या आवडीचा उमेदवार नाही म्हणून, मतदानाच्या दिवशी घरी बसणाऱ्या भाजप समर्थकांमुळे, कसब्यासारखी जागा गमवावी लागली! बाकी मविआ चे अडीच वर्षांचे जंगलराज सगळ्यांनी अनुभवले आहेच! म्हणून कळकळीचा मुद्दा असा की परीक्षा तुमची आहे, माझी आहे. परीक्षेत यशस्वी झालो तर मोदींसारखा नेता पूर्ण बहुमत घेऊन येतो आणि परीक्षेला घाबरून किंवा नाउमेदीने पाठ दाखवली तर देवाभाऊ सारखा योग्य व्यक्ती सत्तेपासून दूर राहतो.. विचार करा!