देवेंद्र फडणवीस योगी महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ

देवेंद्र फडणीस, योगी आणि एक किस्सा

महाराष्ट्रात जरा कुठे काही खुट्ट झालं की “देवेंद्र फडणवीस फार मवाळ आहेत”, “देवेंद्र फडणवीस काहीच करत नाहीत” असे सूर कानावर पडतात. हल्ली हल्ली तर “देवेंद्र फडणवीस यांना घरी बसवा आणि योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रात आणा”, “योगींसारखे बुलडोझर चालवा”. मी प्रांजळपणे मान्य करतो की मी देखील या वाटेवर काही पावले टाकून मागे आलेलो आहे. हे मुद्दे ऐकले की फार वर्षांपूर्वी माझ्या आजोळी घडलेली एक घटना आठवते. माझे आजोबा सांगतात की, ‘गावातून जाणारा रस्ता पूर्वी महामार्ग होता. एकदा सैन्याने आपली सोय म्हणून रणगाडे त्या रस्त्यावरून नेले. त्यामुळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागली. कारण ते रस्ते रणगाड्यांचा भार, त्याच्या चाकांचे घर्षण यांना सोसण्यासाठी बनलेले नव्हते.‘ रस्ता उपलब्ध आहे म्हणून त्याच्यावर रणगाडा चालवायचा नसतो हा झाला तर्क!

गरजेपेक्षा जास्त आणि योग्य वेळेच्या आधी औषध द्यायचं नसतं आणि रोग्याला भलत्या tests घ्यायला लावायचं नसतं!

महाराष्ट्र, हिंदुत्व, देवाभाऊ आणि योगी

आता थोडा आधीचा विचार करूया. योगी आदित्यनाथ एक प्रभावी नेते आहेत यात मुळीच शंका नाही. स्वभावाने आणि वाणीने कडक आहेत हे ही खरं आहे. प्रखर हिंदुत्ववादी आहेत हे तर उघड आहेच. त्याचप्रमाणे (कंटकांच्या घरांवर, मालमत्तेवर) बुलडोझर चालवतात हे ही सत्य आहे. बुलडोझर चालवण्याची आणि अविश्रांत एन्काऊंटर करण्याची वेळ त्यांच्यावर आली याचे मुख्य कारण हे की ते राज्य “उत्तर प्रदेश” आहे. यावर मी पूर्वी ट्विटर वर तर्क मांडलेला आहे. त्याचप्रमाणे उद्या योगी पंतप्रधान झाले तर त्यांना आत्तासारखा बुलडोझर चालवता येणार नाही कारण ते त्यांच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर असेल!

असो… या ब्लॉगमध्ये मी वेगळा मुद्दा मांडणार आहे ज्याच्याकडे भाजप समर्थकांचे आणि “हिंदुत्ववाद्यांचे” फारसे लक्ष जात नाही.

योगी आदित्यनाथ असो नाहीतर हेमंत बिस्वा असो, त्यांच्या राज्यातील भाजप समर्थकांनी आणि हिंदुत्ववादी लोकांनी त्यांना “संपूर्ण बहुमत” दिलेलं आहे. योगींच्या मागे तर हिंदुवाहिनी सतत कार्यरत असते. महाराष्ट्रातील भाजप समर्थकांना मी विचारू इच्छितो (यात मी देखील आहे) की

१. आपण कधी भाजपला संपूर्ण बहुमत दिलेले आहे का?
२. आमचे अमुक काम नाही झाले तर आम्ही भाजपला मत देणार नाही, अशी भूमिका उत्तर प्रदेश चे लोक घेतात का?
३. आपल्याला न पटणाऱ्या निर्णयात देखील आपण आपल्या नेत्याच्या पाठीमागे उभे राहातो का?
४. आपण समर्थक कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरून शक्ती प्रदर्शन करू शकतो का?
५. महाराष्ट्रातील हिंदू म्हणवणारे स्वतःचे रक्षण करू शकतात का?

समर्थकांना केवळ देवाभाऊचा मान राखावा म्हणून कसब्यात भाजपच्या नेत्याला निवडून देता आले नाही, त्यांनी अवाजवी अपेक्षा करताना थोडं जपूनच बोललं पाहिजे!

वरील सर्व प्रश्नांचे उत्तर ढळढळीतपणे “नाही” असे आहे. याचे मुख्य कारण आपला स्वतःवर आणि आपल्याच नेत्यावर विश्वास नाही. नसू दे, पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण ज्याच्यावर आपला विश्वास नाही त्याच्याकडून अपेक्षा ठेवणे देखील मूढपणा आहे, नाही का? मी नेहमी म्हणतो की मला अर्जुन सगळ्यात जास्त आवडतो. याचे कारण असे आहे की अर्जुनाने ज्याला आपला “नाथ” मानले त्याच्या शब्दाबाहेर तो गेला नाही, प्रश्न विचारले पण हेतूवर कधीही शंका उत्पन्न केली नाही. मग तो मोठा भाऊ युधिष्टिर असो, द्रोणाचार्य असोत वा भगवान श्रीकृष्ण असो. प्रत्येक समस्येला एकच उत्तर देऊन चालत नाही. महाभारत घडण्याआधी कृष्णाने देखील शिष्टाई केलीच ना? बरं झालं अर्जुन आपल्यासारखा नव्हता नाहीतर श्रीकृष्णाचे देखील पर्याय शोधले असते! कारण कृष्ण देखील कधी दुर्योधनाला भेटायचा, कधी कर्णाला भेटायचा आणि कधी धृतराष्ट्र आणि शकुनीला. त्यांची माने वळवण्याचा देखील प्रयत्न केला. याला भगवान श्रीकृष्णाची कमजोरी म्हणायची का? मी तुलना करत नाहीये फक्त उदाहरण देत आहे जे महाभारताचा उदो उदो करणाऱ्यांना आठवत नाही. शिखंडी रथ हाकेल, कर्णाचे चाक रुतल्यावर वार केला जाईल आणि द्रोणाचार्यांना अर्धसत्य सांगितलं जाईल.. पण योग्य वेळी! असो मुद्दा इतकाच होता की आपल्या विचारांचा थोडा विस्तार करणं गरजेचं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि राजकारण

आणखीन एक मुद्दा ज्याला मी देखील पूर्वी बळी पडलो होतो तो म्हणजे “देवेंद्र फडणवीस विरोधकांचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत”. खरं तर भाजपच्या रणरागिणी याचे उत्तम उत्तर देऊ शकतील ज्यांनी समाजकंटकांना कोर्टात खेचून त्यांना अद्दल घडवली. पण बहुतांशी समर्थक “असेल हरी तर देईल खाटल्यावरी” mode मध्ये असल्याने सगळं काही दुसऱ्यांनी करावं किंवा “साप पाहुण्याच्या हातून मेला तर बरं!” या विचारात सतत बुलडोझर मॅडनेस मध्ये समाज माध्यमांवर निषेध करतात. गृहमंत्र्यांची आपली मर्यादा असते, कायद्याने राज्य चालले पाहिजे ही त्याची प्रथम जबाबदारी असते. कोर्ट कायद्याने चालतं नाहीतर सरकारला तोंडावर पडायला होतं. देवाभाऊ सत्चरित्र आहेत, हुशार आहेत आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे आहेत. (अनेक भाजप समर्थकांचे लाडके अटलजी असेच होते. त्यात देवाभाऊच्या राजकरणी बुद्धीची जोड मिळालेली आहे) ज्याची त्याची कार्य करायची पद्धत असते. महाराष्ट्राचे राजकारण क्लिष्ट आहे आणि त्यात देवेंद्र फडणवीस हवं तेव्हा नाड्या आवळू शकतात आणि डाव बदलू शकतात हे देखील आपल्याला माहित आहे.

जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये असतात तेव्हा तेव्हा विरोधक अनेक प्रकारे त्यांच्याबद्दल शंका निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात. मग ती खोटी आंदोलनास्त्रे असोत (वाचा) किंवा वेळोवेळी उत्पन्न होणारे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न असोत (विधानसभेच्या काळात उफाळून आलेली कोयता गॅंग आठवते आहे ना?) गंमत म्हणजे भाजप समर्थक सगळ्यात आधी या प्रयत्नाला बळी पडतात!

माझे मत

समर्थकांची नाराजी मी समजू शकतो, आपण सगळेच काही ना काही कारणाने नाराज होतो, नाराजी देखील व्यक्त करतो. आपला अधिकार आहे! पण विचार करा की जरा मनाविरुद्ध काही झालं की तुम्हाला तुमच्या कचेरीत कोणी बदली करण्याची (replace) भाषा करत असेल तर तुमच्या आत्मविश्वासाचे काय होत असेल? हे साधे मानसशास्त्र आहे. नेता कुठल्या मंगळ ग्रहावरून येत नाही, तो देखील माणूसच असतो. मी मागे म्हटल्या प्रमाणे आपल्या नेत्याला आपण मोठं करायचं की पदोपदी त्याचे पर्याय शोधायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. राहिला विषय योगींनी महाराष्ट्रात येण्याचा तर ते काही होणं शक्य वाटत नाही. मला विचारलं तर, किमान एकदा तरी देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण बहुमत द्या आणि मग त्यानुसार अपेक्षा ठेवा! नाहीतर काँग्रेस पुन्हा ये रे माझ्या मागल्या करत दाराशी उभे आहेत.. कर्नाटकात तर आलेच आहेत.. बोलण्यासारखं खूप आहे पण थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे हे अंतिम सत्य!

Spread the love

1 thought on “देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ”

  1. भाजप आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करून लढली आणि आता शिंदेंच्या शिवसेनेच्या नेतृत्व खाली पुढची निवडणूक लढणार.

    जनतेची जरी इच्छा असेल भाजप ला बहुमत द्यायची तरी भाजप महाराष्ट्रात कुठे स्वबळावर लढत आहे. मग भाजपला कसे बहुमत देणार जनता.

    आणि मग जनतेने अपेक्षा ठेवली की योगी किंवा हेमंत विस्वा ह्यांच्या सारखी कडक कारवाई करावी सरकारने मग परत हेच कारण पुढे करायचे की भाजप ला बहुमत कुठे आहे.

    बंगाल सारख्या ठिकाणी जिथे एकही आमदार नव्हता तिथे भाजप दोन नंबरचा पक्ष बनू शकतो प्रयत्न केला तर मग महाराष्ट्रात असे प्रयत्न का नाही करत.

    ते अस आहे की हे असले बौद्धिक विचार मांडणे सोपे आहे पण ज्याला झळ लागते किंवा ज्याच्यावर अन्याय होतो त्यालाच जाणवते की किती लवकर न्याय व्हावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *