देवाभाऊ समज – गैरसमज
देवाभाऊ बद्दल लोकांचे अनेक समज आणि गैरसमज आहेत. कोणत्याही नेत्याच्या बाबतीत हे होणं अगदीच साहाजिक आहे. अनेकदा गैरसमज पसरवले जातात आणि कधी कधी अज्ञान काही समजांना जन्म देते. त्यातून आपल्यासारखे सामान्य लोक जे अशा नेत्यांपासून खूप दूर असतात, त्यांना तर वास्तव समजणं महाकठीण. तरीही जेव्हा आपण कोणाला आपला नेता मानतो तेव्हा त्याच्याबद्दल माहिती ठेवणं हे आपलं कर्तव्य (अरे बापरे!) आहे. ही माहिती नसली की, कोणीही काही वावड्या उठवल्या तरी त्या मान्य कराव्या लागतात किंवा निरुत्तर व्हावं लागतं. आणि जोपर्यंत उत्तर मिळते तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, व्हायचं ते नुकसान झालेलं असतं. समर्थकांच्या मनात आपल्या नेत्यांबद्दल शंका निर्माण करायची ही कूटनीतीची प्राचीन पद्धत आहे.
भारतात सध्या एखादा माणूस खरोखर हिंदू आहे किंवा नाही? हे समाज माध्यमांत पसरलेली माहिती किंवा पत्रकार मंडळी यांनी छापलेल्या बातम्या यांच्यावरून ठरवले जाते. ज्याचे तीर्थक्षेत्रे, मंदिरे किंवा मठ यांना भेट देणे अधिक प्रसिद्ध, तो तितका अधिक कट्टर हिंदू अशी एक समजूत लोकांमध्ये आहे. खासकरून हिंदुत्ववादी लोकांमध्ये तर फारच जास्त. या प्रसिद्धीत काही नेत्यांना नशीब (म्हणजेच पत्रकार आणि समाज माध्यमांवरील influencers) साथ देते आणि काही नेत्यांना नाही. या प्रकाराची दुसरी बाजू अशी की, जो या कर्मकांडासाठी प्रसिद्ध नाही म्हणजेच, पत्रकार किंवा समाज माध्यमे यांनी प्रसिद्ध होऊ दिले नाही, तो “कमी हिंदू” आहे किंवा “कट्टर हिंदू नाही” असे समजले जाते. आपले हिंदुत्व आपण भगवे वस्त्र आणि भस्म यांच्यातच पाहणार आहोत का?
देवभाऊ आणि हिंदुत्व
सध्याच्या हिंदू आणि हिंदुत्वाच्या व्याख्या अनुसरून दोन प्रश्न वाचकांना विचारावेसे वाटतात,
१) कारसेवकाचे हिंदुत्व प्रश्नांकित असू शकते का?
२) कायम देवदर्शन करणारा “पुरेसा” हिंदू नाही असे शक्य आहे का?
माझी खात्री आहे की विचार केल्यानंतर या दोन्ही प्रश्नांचे उत्तर “नाही” असेच येईल. जर असे असेल तर देवभाऊ बद्दल ते कट्टर हिंदू नाहीत किंवा त्यांच्या हिंदुत्वावर शंका आहे असा स्वर का ऐकू येतो? वाचकांना, प्रसिद्ध हिंदू नेते कोणत्या कोणत्या मंदिरांत गेले, अभिषेक करून आले हे माहित असेल. पण, देवभाऊ गेल्या ७-८ महिन्यात किमान २० तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आलेले आहेत, अगणित गणपती आणि दुर्गादेवी मंडळे येथे दर्शन घेऊन आलेले आहेत हे किती जणांना माहित आहे? देवभाऊ अनेक तीर्थक्षेत्रात जाऊन अभिषेक देखील करून आलेले आहेत हे “मी मी” म्हणणाऱ्या हिंदूंना देखील माहित नसेल. देवभाऊ कारसेवक होते, बाबरी मशीद पडली तेव्हा ते देखील कारसेवा करायला गेले होते, हे तरी किती जणांना माहित आहे? हे तर त्याहून विशेष आहे की विरोधकांच्या मते “तथाकथित ब्राह्मण्यवादी” देवाभाऊ ना भेटायला धनगर समाजाची प्रतिष्ठित मंडळी देखील आपुलकीने येतात. देवभाऊ खरोखर विरोधक म्हणतात तसे असते तर हे घडलं असतं का?
सामान्य भाजप समर्थक, हिंदू influencers मंडळी, देवभाऊच्या या बाजूपासून संपूर्णपणे अनभिज्ञ आहेत. हे असे का? याचा विचार करणे गरजेचे आहे. अति सुमार दर्जाच्या तथाकथित लोकनेत्यांच्या समाज माध्यमांतील पोस्टना वाट्टेल तितकी प्रसिद्धी मिळते. याला कुठे ना कुठे भाजप आणि देवभाऊ समर्थक देखील जबाबदार आहेत.
तसेच येत्या वर्षाचा गुढी पाडवा देवाभाऊने अत्यंत उत्साहात साजरा केला. तथाकथित सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या आपल्या देशातील राजकारणात गुढी उभारताना किती नेत्यांनी गुढी उभारताना आपले फोटो टाकले? पूर्वी देखील किती मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे हिंदूंचे नववर्ष साजरे केलेले आपल्याला आठवतात? हा प्रश्नही महत्वाचा आहे. इतकं असूनही जर आपल्याला देवभाऊ च्या हिंदुत्वावर शंका घ्यावीशी वाटत असेल तर मात्र पुनर्विचार करण्याची नक्कीच गरज आहे!
आणखीन एक घटना जी फक्त देवाभाऊ आल्यावर घडली. इतकी वर्षे मराठ्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना जी गोष्ट जमली नाही, ती म्हणजे म्हणजे “प्रतापगडावरून अफजलखानाची कबर हटवणे“. सतत भावना दुखावून घेणाऱ्या समर्थकांना याची आठवण होत नाही, होणार नाही!
समर्थक आणि त्यांची जबाबदारी
एक खोट आपल्यात देखील आहे. विरोधकांच्या ट्विट्स आणि पोस्ट्स खाली निव्वळ कुरघोडी करण्याच्या दृष्टीने, इंग्रजीत ज्याला point scoring म्हणतात त्या साठी आणि त्याच्याही पलीकडे जाऊन कधी कधी स्वतःचे followers/पाठीराखे इत्यादी वाढवण्यासाठी रेंगाळणारे अनेक भाजप आणि देवाभाऊचे समर्थक दिसतील. याचे नुकसान असे की नको त्या माणसाचा म्हणजेच विरोधकाचा reach वाढतो आणि त्याचे तद्दन टाकाऊ विचार गरजेपेक्षा (खरे तर लायकीपेक्षा) जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. भांडाभांडी, शिव्याशाप, धमक्या आणि तर्क वितर्क उदंड होतात. पण हे सगळे करत असताना आपल्याच नेत्याच्या विधायक कामाचा, निर्णयांचा, आणि विचारांचा प्रसार करायला आपण विसरतो, मागे पडतो. “त्यांनी” काय केलं हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहेच पण आपला नेता काय म्हणतो आहे किंवा करतो आहे, हे लोकांपर्यंत पोहोचणं देखील तितकंच गरजेचं आहे.
हेच कारण आहे की महाराष्ट्रात विरोधकांच्या फालतू ट्विट्स आणि पोस्ट्स ना हजारो लाईक्स असतात, त्यांना WhatsApp सारख्या माध्यमांतून वणव्यासारखे पसरवले जाते, पण देवभाऊच्या लोकांच्या, समाजाच्या दृष्टीने उत्तम विचारांना, कार्यांना काही शेकडाच लोक बघतात, काही हजार लोकांनीच ते विचार वाचलेले असतात. मग प्रश्न तर हा उपस्थित होतो की आपल्याच नेत्याचे विचार जर आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकत नसलो तर कोणत्या नात्याने आपण स्वतःला समर्थक म्हणवून घेतो? पटत नसेल तर, त्याबद्दल मी वरच्या परिच्छेदात एक मूलभूत प्रश्न विचारलेलाच आहे, तो प्रश्न पुन्हा एकदा वाचा. कोणत्या विरोधकाने काय बोलले होते हे आपल्याला माहित असते पण, देवाभाऊ सारखे मोठे नेते नक्की काय म्हणाले हे आपल्याला माहित नसतं. आपल्याच नेत्याचे म्हणणे आपल्याला माहित नसणे हे चांगल्या समर्थकांचे लक्षण आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारणे देखील गरजेचे आहे.
मी अनेकदा भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांना मुलाखतीत उत्तर देताना “कोण काय म्हणाले या पेक्षा मोदी जी किंवा अमित शहा जी काय म्हणाले ते बघा” असे म्हणताना ऐकलेले आहे. माझ्यामते हे सर्वोत्तम उत्तर आहे, विनाकारण वाद विवाद घडवू पाहणाऱ्यांसाठी. दुर्दैवाने आपल्याकडे समर्थकच काय नेतेसुद्धा “कोण काय म्हणाले यापेक्षा देवभाऊ काय म्हणाले ते पाहा” असे म्हणताना दिसत नाहीत. याचे एक मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील भाजप समर्थक आधी हिंदू आहे आणि नंतर भाजप समर्थक. ही वस्तुस्थिती आहे. याचे समांतर मला आधी मी भारतीय आहे आणि मग हिंदू आहे, या वाक्यात दिसते. हा एक जुना वाद आहे ज्याचे उत्तर ज्याने त्याने शोधायचे आहे. पण सनातन धर्म कितीही मोठा असला तरीही त्याचे पालन करण्यासाठी माणसांनाच पुढे यावे लागते हे वास्तव विसरून चालणार नाही. म्हणूनच आदी शंकराचार्यांच्या अनुयायांना अनन्यसाधारण महत्व आहे.
प्रश्न असा आहे की देवाभाऊच का?
देवभाऊच का?
उत्तर असे आहे की स्पष्ट सांगायचं तर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी देवाभाऊपेक्षा अधिक योग्य आणि उत्तम नेता आत्ता तरी महाराष्ट्रात कोणीच नाही हे सत्य आहे. तसे नसते तर जातींचे राजकारण करणाऱ्या विरोधकांनी देवाभाऊ ला कधीच निवृत्त करून टाकले असते. कारण त्या विरोधकांनी स्वतःच्याच लोकांना ते मोठे होत आहेत हे बघताच खाली खेचलेलं आहे. सत्य तर हे आहे की लोकनेत्याची शक्ती “लोक” आहेत. जर लोकच आपल्या नेत्याच्या मागे ठामपणे उभे राहिले नाहीत, बऱ्या वाईट प्रसंगात नेत्याच्या निर्णयाचा आदर करू शकले नाहीत, पत्रकार-समाज माध्यमे यांच्यात पसरवलेल्या बाता सत्य मानून शंका उपस्थित करत राहिले, तर केवळ तोंडाची वाफ दवडून काय फायदा आहे? दशकांच्या हिंदू विरोधी राजकारणाने हिंदू आणि हिंदुत्ववादी ग्रासलेला आहे, उद्विग्न आहे. मान्य आहे. पण हिंदू म्हणवून घेणाऱ्यांनी देखील थोडा धीर धरणं आवश्यक आहे. हिंदू फक्त मंदिरापुरता मर्यादित ठेवलात तर नुकसान महाराष्ट्राचे होणार आहे आणि पर्यायाने आपले.
टीका करणे आणि योग्य व्यक्तीच्या काही न पटणाऱ्या गोष्टी देखील समजून घ्यायचा प्रयत्न करणे यात खूप फरक आहे. खरं सांगायचं दशकानुदशके लोकांवर सत्ता चालवणाऱ्या विरोधकांमध्ये आणि हिंदुत्ववादी लोक यांच्यात हाच मुख्य फरक आहे. हिंदू विरोधक आपल्या नेत्यांवर संपूर्ण विश्वास ठेवतात आणि हिंदुत्ववादी आपल्याच नेत्यांना हिंदू असण्याची सर्टिफिकेट्स मागत बसतात. दुर्दैवाने देवाभाऊच्या बाबतीत असे घडताना दिसते. हिंदुत्व आणि हिंदू यांच्याविषयी तळमळ असणारे निव्वळ माहिती नसल्यामुळे देवाभाऊला कट्टर हिंदू किंवा हिंदुत्ववादी मानत नाहीत, असे तर नाही ना? याबद्दल थोडं अवलोकन होणं गरजेचं आहे.
समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकातील एक पंक्ती जी माझ्यामते अत्यंत कारुण्यपूर्ण प्रार्थना आहे... “उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचि आता” गुणवंत माणसाची उपेक्षा होऊ देऊ नकोस असा जणू काही आकान्त समर्थांनी या प्रार्थनेत केलेला आहे. २०१९ ला जेव्हा देवाभाऊला राजकीय कारस्थान करून मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवले गेले तेव्हा ही पंक्ती मला आठवली आणि जाणवलं की समर्थांनी ही प्रार्थना, याचना त्या परमेश्वराला का केली असावी? त्याबद्दल मी तेव्हा लिहिले देखील होते.
देवभाऊ आणि आपली जबाबदारी
याचा अर्थ “आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांची टीका करूच नये का?” असा मुळीच नाही. हा प्रश्न आत्तापर्यंत अनेक वाचकांच्या मनात आलेला असेल म्हणून त्याचे उत्तर देत आहे. टीका करा, जरूर करा. अगदी मुद्देसूद सडकून टीका करा. पण हे करत असताना आपण “अमुक एक गोष्ट नाही केली तर इथून पुढे तुम्हाला समर्थन नाही” हे म्हणताना, एका योग्य माणसाच्या हातातील सामर्थ्य कमी करत नाही ना? टीका करताना टोकाची भूमिका घेऊन देवाभाऊ विषयी विनापुरावा संभ्रम पसरवत नाही ना? याची काळजी घेणं गरजेचं आहे. समर्थक कोणत्याही वेळी आपले कान पकडू शकतो ही भीती नेत्याला असली पाहिजे आणि वेळ प्रसंगी तोच समर्थक शेवटपर्यंत आपली पाठ सोडणार नाही हा विश्वास देखील असला पाहिजे. तरच आपल्या विचारसरणीचा नेता सत्तेत राहू शकतो, आपल्या विचारसरणीनुसार कारभार करू शकतो. अशी परिस्थिती आत्ता आहे का? विचार करायला लावणारी परिस्थिती आहे.
कालच झालेल्या भाजप महाराष्ट्राच्या एका बैठकीत देवाभाऊ म्हणाले की, “आपला सामान्य कार्यकर्ता नॅरेटिव्हची लढाई लढत आहे.” खरं आहे पण देवाभाऊ “तुमच्या” narrative साठी किती जण लढत आहेत? हा प्रश्न जितका भाजपच्या कार्यकर्त्यांना लागू पडतो, तितकाच तो समर्थकांना देखील लागू पडतो. समर्थक यात यशस्वी होताना तर निश्चितच दिसत नाहीत. आपल्या माणसाला आपण मोठं करायचं असतं हे मराठी माणसाला क्वचितच समजतं. तसेच कार्यकर्त्यांनी देखील समर्थकांचा संताप वैयक्तिक न घेता तो ऐकून घेतला पाहिजे. आज समर्थक आणि कार्यकर्ते यांच्यातील अंतर वाढण्याचे हे देखील एक कारण आहे कारण समाज माध्यमांवरील टीका करणाऱ्या समर्थकांना जवळजवळ टाळले जाते. कार्यकर्त्यांनी हे समजून घेणं देखील गरजेचं आहे की समाज माध्यम जरी virtual असले तरीही माणसे virtual नाहीत, त्यांचे प्रश्न खोटे नाहीत आणि त्यांच्या अपेक्षा देखील चुकीच्या नाहीत! असो, हा विचार भाजप पक्षाने करायचा आहे कारण समर्थक तर तिथेच असतील!
छद्मी पत्रकार आणि समाज माध्यमांच्या जमान्यात ज्याला आपल्या नेत्याबद्दल काय वाचायचं अथवा वेचायचं आणि काय नाही हे समजलं तोच आपल्या नेत्याच्या मागे खंबीरपणे उभा राहून त्याची शक्ती बनू शकतो. ही एक जबाबदारी आहे. नाहीतर, समर्थकांच्या पाठिंब्या अभावी वाजपेयीजींसारख्या योग्य नेत्याला सत्तेबाहेर राहावं लागलं होतं हा इतिहास आहे. आणि यातून आपण काही शिकणं गरजेचं आहे. एक लक्षात असू दे “यतो धर्मस्ततो जयः” इतकी कारस्थाने करूनही आपला नेता खंबीरपणे उभा आहे हे स्मरणात असू दे.
असो, तो परमेश्वर कृपा करेल तेव्हा करेल पण देवभाऊचे समर्थक, देवभाऊ काय बोलतात, करतात याकडे अधिक लक्ष देतील की नाही? हा खरा प्रश्न आहे.
तळटीप:
होय मी भाजप समर्थक आहे, देवभाऊ यांचा समर्थक आहे. तरीही भाजप समर्थकांची व्यथा, आक्रोश आणि मनोवस्था मी आधी या ब्लॉगमध्ये मांडलेली आहेच. ती देखील वाचा. अधिकार आणि कर्तव्य हे समांतर रूळ आहेत ज्यांच्यावर प्रत्येकाला चालावं लागतं. भाजपचे समर्थक याला अपवाद नाहीत!
3 thoughts on “देवभाऊ, हिंदू आणि हिदुत्व”