एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खरं तर मन किती प्रयत्न करतं. प्रयत्न करतं म्हणजे त्याच्या परीने जेवढं करता येईल तेवढं करत असतं. मजेची गोष्ट अशी की तेवढं ही पुरं पडत नाही. ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही. तेव्हा मनाला प्रश्न पडतो की असं का झालं ? मी कुठे कमी पडलो ? याचं उत्तर शोधायला गेलं की जाणवतं की ते आपल्या नशिबातच नसतं ! नियतीला दोष द्या नाहीतर अजून कशाला … काही गोष्टी जमत नाही त्या नाहीच .. हातच कापत असतील तर दारं खिडक्या बंद केल्या तरीसुद्धा पत्त्यांचा बंगला उभा करता येत नाही हेच खरं !
मला वाटलेलं पत्त्यांचा बंगला बांधणं
खऱ्या बंगल्यापेक्षा सोपं असतं
खोट्या भ्रमामागे बेभान धावणं
आयुष्य जगण्यापेक्षा सोपं असतं
सावरले स्वताला, दारे सारी बंद
खिडकीही बंद होती
फांदीवर त्या समोर पक्षिणी
घरटे बांधत होती
तिरप्या दोन पत्त्यांना
आधार देत होतो
जपून जपून आणिक
श्वासाला रोखत होतो
परत घसरत होते
पडत होते पत्ते, काय गडबड होती ?
माझ्या कल्पनेतल्या मजल्यांची
अशी का पडझड होती ?
वारा नव्हता कुठेही, प्रयत्न करता करता
पत्तेही वाकत होते
पक्षिणी म्हणे हसून बंगला होईल कसा ?
तुझे हातच कापत होते !