अमृता फडणवीस देवेंद्र फडणवीस गाणे

अमृता फडणवीस, देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक अपरिपक्वता

अमृता फडणवीस आणि देवाभाऊंचे चाहते

ज्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस “देवाभाऊ” महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक महत्त्वाचे नेते म्हणून नावारूपाला आलेले आहेत, तेव्हापासून त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. सर्वगुणसंपन्न कोणीच नाही. पण महाराष्ट्रात दुर्दैवाने काही लोकांना सर्वगुणसंपन्न होण्याची मुभा मिळालेली नसते. विशेषतः जर ती व्यक्ती लोकप्रिय नेत्याच्या कुटुंबातील असेल तर. अमृता फडणवीस सोशल मीडिया वर मनमोकळेपणाने त्यांचे मत मांडतात, त्यांच्या आवडी जपण्याचा प्रयत्न करतात आणि कॅमेऱ्याला घाबरत नाहीत. महाराष्ट्राला आजवर कोणत्याही नेत्याच्या पत्नीने असे काही केलेले बघण्याची सवय नाही.

मोठ्या राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना सर्वगुणसंपन्न नसण्याची मुभा मिळालेली नसते आणि महाराष्ट्राला आजवर कोणत्याही नेत्याच्या पत्नीने असे काही केलेले बघण्याची सवय नाही.

मी हे प्रांजळपणे मान्य करतो की मलाही कधी कधी त्यांचे असे वागणे विचित्र वाटते कारण मला त्यांची मते पटत नाहीत किंवा त्यांचा मत मांडण्याचा लहेजा आवडत नाही. याचे मूळ देवाभाऊ बद्दल जिव्हाळा आहे हे ही सत्य आहे. मी आणि अमृता फडणवीस यांच्या मतांवर किंवा त्यांच्या अभिव्यक्तीवर आक्षेप घेणार्‍या देवाभाऊंच्या चाहत्यांना ही भीती सतत छळते की त्यांचे असे वागणे देवाभाऊंच्या राजकीय प्रगतीच्या आड येऊ शकते. मध्यंतरीच्या काळात विचार करता करता मला इतिहासातील दोन घटनांची आठवण झाली. अनेकांना कटु वाटेल पण त्या घटनांचा विचार करता मला “आमची” सामाजिक अपरिपक्वता दिसू लागली. त्याच्याबरोबर लोकांच्या सूक्ष्म स्मरणशक्तीची देखील जाणीव झाली. सध्या अमृता फडणवीस यांनी परिधान केलेल्या कपड्यांवरून चौफेर टीका होत आहे. टीका करण्याला कोणाचा विरोध नाही पण त्या आडून विनाकारण कोणाच्या चारित्र्याचे हनन होत असेल तर ते अमान्य आहे.

हा ब्लॉग लिहिताना मी याची काळजी घेतलेली आहे की विषय “समाजाच्या प्रतिक्रियेवर”च राहील. त्यामुळे भारतीय समाज, स्त्री – पुरुष असमानता, वैयक्तिक स्वातंत्र्य इत्यादी विषयांची अपेक्षा ठेवणार असाल तर तुमच्या पदरी निराशा येणार हे नक्की!

सामाजिक अपरिपक्वता आणि इतिहास

अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेप घेणारे “आम्ही” नेहमी असं म्हणतो किंवा भीती व्यक्त करतो की, “त्यांच्या अशा वागण्याने देवाभाऊंच्या छबीवर प्रश्नचिन्ह लागू शकते, बदनामी होऊ शकते कदाचित चेष्टा देखील होऊ शकते”.

कोणत्याही घटनेचा तात्विकदृष्ट्या विचार करताना, या आधी अशी घटना घडली आहे का? हा प्रश्न विचारणं आणि त्याचे उत्तर शोधणं आवश्यक असतं. आधी नमूद केल्याप्रमाणे या अमृता फडणवीस, त्यांची अभिव्यक्ती आणि मतप्रदर्शन या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मला इतिहासातील दोन घटना आठवल्या. त्या घटनांचा सखोल विचार केल्यानंतर मला माझ्याच मतांत असणारा विरोधाभास दिसून आला. तसेच अनेक मोठ्या आणि दिग्गज राजकीय नेत्यांच्या वर्तणुकीची किंवा वर्तणुकीच्या संस्कृतीची कीव आली.

अशी किती उदाहरणे द्यावी? नेता असला तरी माणूस आहे. प्रत्येक माणसाचे वैयक्तिक आयुष्य आपल्याला पटेल असे असेलच असे नाही. बलात्कार आणि वैवाहिक फसवणुकीच्या केसेस असलेले पुरुष नेते अजूनही निवडणूका जिंकत आहेत पण एक देवाभाऊ च्या पत्नीने तुम्हाला पटेल आणि रुचेल तसे वागले नाही तर गहजब होतो!

कुटुंबीयांनी लोकांना आवडेल असे काम नाही केले तरीही, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची आजही एक लोकप्रिय नेता म्हणून आठवण काढली जाते. आपण आपल्या नेत्याच्या चारित्र्याकडे, विचारांकडे, कृतीकडे बघायचं की त्यांच्या कुटुंबियांच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न.

अशाच विचारात असताना एकदा निकटवर्तीयांशी गप्पा मारताना एका माजी मुख्यमंत्र्यांची आठवण निघाली. तेव्हा मी शाळेत होतो आणि त्यांच्या मुलाचे हिंदी सिनेमासृष्टीत आगमन झाले होते. त्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाची सिनेमातील पात्रे, नाच – गाणी, पेहराव आणि एकंदर अभिनय बघता बहुतेक लोकांनी आपली नापसंती दर्शवली होती. अनेकांनी अभद्र शब्दात देखील टीका केलेली आठवते. मुख्यमंत्र्यांच्या मुलाने असे करणे शोभत नाही असे देखील काही म्हणाले होते. पण ही टीका करताना, “मुलाने सिनेमात अशा प्रकारचे काम केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या छबीवर परिणाम होईल किंवा लोक त्यांच्यापासून दूर जातील किंवा त्यांची लोकप्रियता कमी होईल” अशी शंका कोणीही व्यक्त केल्याचे विशेष आठवत नाही. गम्मत म्हणजे, आजही त्या मुख्यमंत्र्यांची एक “लोकप्रिय नेता” म्हणून आठवण काढली जाते.

हा इतिहास ऐकून टीका आणि शंका यातला फरक समजून घ्यायला नक्कीच मदत होईल. माजी मुख्यमंत्र्यांच्या चाहत्यांमध्ये आणि देवाभाऊंच्या चाहत्यांमध्ये कदाचित हाच तो फरक असावा. ते नेत्याकडे जास्त बघतात आणि हे त्यांच्या आजूबाजूचे काय करतात याच्याकडे. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमे याला काही अंशी जबाबदार आहेतच. पण, आपण आपल्या नेत्याच्या चारित्र्याकडे, विचारांकडे, कृतीकडे बघायचं की त्यांच्या कुटुंबियांच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न.

मनाला पटलेलं सत्य जर मांडता येत नसेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल वाजवण्यात काहीच अर्थ उरत नाही!

आता दुसरे उदाहरण. हे उदाहरण खूप जुने आहे आणि लोकांची आस्था जोडली गेलेली आहे. इथे मी कोणाची कोणाशी तुलना करत नाहीये फक्त समाजाच्या विचार करण्याच्या पद्धतीची आणि अपरिपक्वतेची मिमांसा करत आहे. तरीही गैरसमज होऊ शकतात हा धोका पत्करून मी खालील उदाहरण देत आहे. मनाला पटलेलं सत्य जर मांडता येत नसेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल वाजवण्यात काहीच अर्थ उरत नाही!

प्रभू श्रीरामांवर फक्त डाव्या विचारसरणीचीच नव्हे तर स्वतःला पुढारलेल्या विचारांची समजणाऱ्या उजव्या विचारसरणीची मंडळी देखील आक्षेप घेतात की, “त्यांनी केवळ लोकांच्या सांगण्यावरून सीतामातेला स्वतःपासून आणि अयोध्येपासून दूर का केलं? त्यांना दुःखात का लोटलं?”

या प्रश्नावर अनेकांनी आपापल्या पद्धतीने उत्तर दिलेले आहे. इंटरनेटवर याविषयावर अजूनही चर्चा केली जाते. याचे मूळ कारण असे आहे की “ज्याला आपण देव मानतो त्याने अन्याय कसा केला?”

असो, मुद्दा हा नाहीये.

मुद्दा हा आहे की, कोणीही उठतो आणि प्रभू श्रीरामांवर आरोप करतो पण आजतागायत कोणीही त्याकाळच्या अयोध्येच्या जनतेच्या संकुचित आणि अपरिपकव विचारांवर छोटेसे देखील प्रश्नचिन्ह लावलेले दिसत नाही! का? ज्या अयोध्येतील जनतेच्या अपरिपक्व, शंकाळू आणि नादान विचारांमुळे प्रभू श्रीरामांवर, स्वतःच्या राजावर ती दुर्दैवी वेळ आली त्या जनतेला कोणीही “तुम्ही इतके अपरिपक्व कसे?” हा प्रश्न आज कोणीच का विचारत नाही? मुळात सीतामातेवर शंका घेणं ही पहिली चूक आणि मातेवर शंका असल्याने प्रभू श्रीरामांवर आरोप करणे ही तर घोडचूक. मी तर इथपर्यंत म्हणेन की या अपरिपक्व आणि नादान जनतेमुळे माझ्या प्रभुंना आणि त्यांच्या कुटुंबियांना दुःख भोगावं लागलं! आपल्या शंका आणि मान्यता कोणत्या थराला न्यायच्या हे जनतेला समजणे आवश्यक आहे. विशेषतः जेव्हा शासक एक उत्तम, चारित्र्यवान आणि प्रश्नातीत नेता असतो.

अमृता फडणीस आणि माझे अवलोकन

आपली राजकीय मते किंवा कोणतीही कलाकृती लोकांसमोर आली की त्याची टीका होणं अगदी स्वाभाविक आहे आणि अमृता फडणवीस यांना देखील त्याला सामोरे जावे लागणार आहे हे सत्य आहे. यापुढेही त्यांच्या न पटलेल्या मतांवर टीका केली जाणार. पण, त्यांनी आपले मत मांडू नये, आपल्या आवडीच्या गोष्टी करू नये हे म्हणणं माझ्या मनाला पटणार नाही. आपण राजकीयदृष्ट्या परिपक्व होणं गरजेचं आहे.

“देवभाऊंची पत्नी” अमृता फडणवीस काय लिहितात?, कोणते मत व्यक्त करतात? किंवा वैयक्तिक आयुष्यात कोणते छंद व आवडी जोपासतात?, यांचा देवाभाऊंच्या राजकीय कारकिर्दीवर काय फरक पडेल? याबद्दल शंका घेण्याऐवजी देवाभाऊंच्या चाहत्यांनी, समर्थकांनी देवाभाऊ काय म्हणतात, करतात याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांचे निर्णय पटले नाहीत तर टीका नक्की करावी, मतभेद असले तर त्यांच्याबद्दल चर्चा नक्की करावी पण प्रत्येक क्षणी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. तरच त्यांचा राजकीय मार्ग प्रशस्त होऊ शकेल.


सुसंस्कृत शब्दात आपले मत नक्की नोंदवा. विचार आवडले असतील तर नक्की शेअर करा! तसेच आमचे इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *