कलाकाराला मिळणारा एकांत म्हणजे एक दुधारी तलवार असते .. तो एक मोहपाश असतो ज्याचा मोह सुटत नाही आणि एकदा अडकलो की पुन्हा भौतिक जगात यावस वाटत नाही. एकांत म्हणजे फक्त आजूबाजूला कोणी नसणे नव्हे ही तर एक मनाची अवस्था असते जेव्हा माणूस अंतर्मुख होत असतो. या एकांताची कारण शोधायची असतील तर आधी मनात वाकून पहाव लागेल. मनाने गुंफलेल्या भावनांच्या प्रत्येक नाजूक गजऱ्यात कुणाचा तरी गंध वसलेला असतो. कदाचित म्हणूनच माणसं दूर गेली तरी त्यांच्या आठवणी दरवळत रहातात. असाच एखादा प्रेमाच्या धाग्याने ओवलेला गजरा कोणी जर मोकळा केला तर तो दूर जातानाही आपला गंध आपल्या पाकळ्या वाटेवर सांडत जातो .. मग एकांतात हरवलेल्याला त्या वाटेवर चालण्यावाचून मनाला काहीच सुचत नाही..
तू गेलीस त्या वाटेवर
मन माझे भरकटलेले ,
अंगण मात्र शांत,
अबोल, पाणावलेले
घरटेही आता स्तब्ध
काड्याच उरल्या मागे ,
फुले सुकलेली त्यावर
काळाचे रेशमी धागे ,
टिकून आहे मात्र
फांदीवर नाव कोरलेले
तू गेलीस त्या वाटेवर …
गंध तुझा कधी
हा वारा हिरावून नेतो ,
आभास माझा कधी
तुलाच घेऊन येतो ,
भिंतीवरचे चित्र तुझे
सावल्यांनी झाकलेले
तू गेलीस त्या वाटेवर …
देव्हाऱ्यात अजून आहे
दिवा तू लावलेला ,
ज्योतीसम मात्र मी
एकटाच चेतलेला ,
मागू मी काय त्याला
त्यानेच सारे नेले
तू गेलीस त्या वाटेवर …
आता न उरली रात्र
न चांदण्याचे हसणे ,
न एकांत सुखावलेला
न तुझे लाजणे ,
मोजत जातो आता
क्षण माझे विस्कटलेले
तू गेलीस त्या वाटेवर …
किरणे बसतात कधी
पायरीवर उदास ,
कधी घरावर सखे
झुकून येत आकाश ,
झाड उभे एक वेडे
विजेवर भारलेले
तू गेलीस त्या वाटेवर …
सांगायचं होत काही
ऐकायचं होत काही ,
शपथांना तू दिलेल्या
मी विसरलो नाही ,
आता मागे फक्त
शब्द .. शब्द .. शब्दच उरलेले
तू गेलीस त्या वाटेवर …
Rolla, MO (US)