वादळ

मनाची अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे हे मन एक घन वस्तू नाही. अनंत तलम, कठोर, कधी पारदर्शक, कधी अर्ध पारदर्शक पटलांचे थर या मनात असतात. पण ही पटले म्हणजे मिटलेल्या फुलाच्या पाकळ्या नव्हे! वेळोवेळी मन एकेक पटलाला आपल्या भोवती गुंडाळत असते आणि म्हणूनच ही पटले आणि फुलाच्या पाकळ्या यांच्यात मुलभूत फरक आहे. प्रत्येक ज्योतीला जशी कधीतरी अगदी प्राणांहून प्रखर होण्याची लालसा होते आणि ती इर्षेने फडफडू लागते तसंच थोड मनाच देखील आहे.. काही काळ वैराग्याचा पटलात लपून झाले, थोडे एकाकी राहून झाले की मनात पुन्हा एकदा आयुष्य जगण्याची इर्षा निर्माण होते. याला प्रतिशोध म्हणता येणार नाही कारण याचा हेतू चांगला असतो. असं वाटतं की कुठला तरी वादळ यावं आणि एका झापेसरशी सारं आयुष्य बदलून टाकावं. पण जशी कुठल्याही दैवदत्त गोष्टीला आपली एक गती असते त्याचप्रमाणे आयुष्यालाही एक गती असते. क्षणार्धात येणारं आणि जाणारं हे वादळ नेहमीच फक्त साचलेलं पाणी वाहून नेईल याची हमी कोण देणार? आणि कशावरून आपल्या आयुष्यात आपण येऊ घातलेलं वादळ दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळणार नाही..?!

वादळ जेव्हा येतं
तेव्हा त्याला थोपवता येत नाही
असंच एक वादळ होतं ,
लपलेलं झोपलेलं घाबरलेलं
जागं झालंय आता ते
त्याला सांभाळता येत नाही

सडलेली किडलेली रोपं
जोमाने फोफावली होती ,
त्यात होती काही फुलं
आणि काही अंकुर ,
ते वादळ आलंच जर
या रानाला चिरडायला
त्याला थांबवता येत नाही

होरपळून करपून मेलेल्या
चितांचे मनही जळाले ,
कधी तेज पणत्यांचे
कधी शस्त्र मशालींचे ,
पण हा वणवा आलाच
माणस चेतवायला
त्याला आवरता येत नाही

कैक दिवसांनी जाग्या
झालेल्या वादळात
जाईल वाहून बरंच काही ,
सोन्याच्या विटांचे महाल
आणि काड्यांचे झोपडेही ,
वाहून गेलेलं गाव
वाहून गेलेलं मन ,
पुन्हा उभं करता येत नाही

हे वादळ ज्या ज्या
रस्त्यावरून जाईल
त्या रस्त्यांना
प्रशस्त करता येत नाही
हे वादळ थोपवता येत नाही !

Rolla, MO (US)

Disclaimer & Policy

Spread the love

1 thought on “वादळ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *