नाकर्तेपण एक असा शाप आहे जो कोणालाच पचत नाही. आपण नाकर्ते आहोत ही कल्पना देखील मनाला मुळापासुन हादरवून सोडते. आजच्या जगामध्ये (ऐहिक जगामध्ये ) जेवढं नाकर्ते पण आहे तेवढं माणसाने कधीच पाहिलं नव्हतं ! असं गेली अनेक वर्षे अनेक जण सांगत आलेले आहेत. आजही सांगत आहेत.. म्हणजे परिस्थिती बदललेली नाही. कोणी बदलायला गेलाच तर त्याच आयुष्य विलासितेच्या दुष्टचाक्राखाली चिरडले जाते. अशा परिस्थितीत जेव्हा कोणी आपण महान देशाचे पुत्र आहोत वगैरे सांगायला लागला की त्याला सांगावसं वाटतं की देश जरी महान असला तरीही आपण सगळे नपुंसक आहोत .. गुलाम आहोत ! .. तरीही त्याची दया येते कारण तो पोटतिडकीने सांगत असतो हा देश महान आहे! .. हे राष्ट्र महान आहे!
हे राष्ट्र संस्कृतीचे आहे
हे राष्ट्र प्रेषितांचे आहे
तरीही
हे राष्ट्र नेत्यांचेही आहे
गरीबाच्या आतडीचा घोट घेणाऱ्या कोयात्यांचेही आहे
हे राष्ट्र दरोडेखोरांचे आहे, गुंडांचे आहे
कामगारांच रक्त गाळणाऱ्या बंडांचे आहे
दांडग्यांच्या खिशात जाणाऱ्या फंडांचे आहे
हे राष्ट्र भारतमातेचे आहे
सती सदाचारीणींचे आहे
तसेच
ते बेघर लाचार भिकारीणींचेही आहे
पाठ सोलणाऱ्या गोणींचे आहे
उकिरड्यावर पडलेल्या द्रोणींचे आहे
हे राष्ट्र अस्मितेचे आहे
हे राष्ट्र मोठ्या थोरांचे आहे
आणि
हे राष्ट्र जागतिक चोरांचे आहे
पैशासाठी नाचणाऱ्या मोरांचे आहे
भ्रष्ट साहेबाचे आहे, क्रूर विलासितेचे आहे
आणि विद्येला बाजारात नेणाऱ्या नाफेखोरांचे ही आहे
हे राष्ट्र प्रेमाचे आहे
हे राष्ट्र भावबंधांचे आहे
तसेच
हे राष्ट्र रावांचे आहे , बाबांचे आहे काकांचे आहे आणि दादांचे आहे
हे राष्ट्र विकलेल्या मतांचे आहे
हिंसेच्या पिकांचे आहे भुकेच्या खतांचे आहे
हे राष्ट्र वीरांचे आहे
स्वातंत्र्य सैनिकांचे आहे
तरीही
हे राष्ट्र खोट्या आंदोलकांचे आहे
धर्माच्या चिंध्या करणाऱ्या, माणसाला आग लावणाऱ्या गंधाकांचे आहे
आणि हे राष्ट्र माझ्यासारख्या नपुंसकांचे ही आहे
कुणाला गुलाम हवेत का गुलाम ?..
ठासून मान्य करत नसलो तरी सगळेच झालोय गुलाम
मोडून पडलो तरी मान वर करणार नाही
आमच्या ओठातले अन्न म्हणजे गटारातली घाण आहे
चाबकाचे फटके खाऊनही म्हणत राहू हे राष्ट्र महान आहे … हे राष्ट्र महान आहे!