(काल्पनिक) बालपणीच्या आठवणी मनावरून कुणालाच सहसा पुसून टाकता येत नाहीत. काही काही आठवणी जशा नाजूक तशा काही व्यक्तीही नाजूक असतात. अशीच एक आठवण माझ्या मनात गेली कैक वर्षे घर करून आहे. ती माझ्या घरासमोर रहायची, जेमतेम माझ्याच वयाची. पण ती खेळकर होती, गोंडस होती आणि विशेष म्हणजे फक्त माझ्याशीच खेळायची. तिचा लाडका खेळ भातुकली. माझ्या बहिणीमुळे मला या खेळाचे काही नियम कळलेले होतेच. भातुकलीत रमता रमता एके दिवशी तिने गाव सोडले. ती जाताना मला भेटली नाही. हे एका अर्थी बरंच झालं कारण तिचे अश्रू बघून मला ही रडू आलं असतं… तिचं नाव होतं “अबोली”
माझ्या बालपणी ती
भातुकली मांडत असे
मी राजा आणि ती राणी
खेळाच्या संसाराला
स्वप्नांच्या भिंती केल्या ..
रुसण्याचे भांडण्याचे
दोघांचे हक्कच होते
ते तसेच होते नाते
तिच्या हुंदक्यांनी केल्या
माझ्या पापण्या ओल्या ..
कोण्या सांजवेळी ती
सोडून गाव गेली
डाव ही विसरून गेली
काळाच्या गर्द थराने
रेषा मनाच्या पुसल्या ..
आता मजपाशी फक्त
नाव तिचे अबोली
तिची जुनी बाहुली
आणिक बाकीच्या खुणा
मेघांत अलगद विरल्या ..
तिने दिलेल्या शपथा
अन मी दिलेली फुले
दोघांचे मिटले अंतर
सुकून गेले दोघे
हातात पाकळ्या उरल्या …