कंटाळवाणे आंदोलनास्त्र
कोणताही सिनेमा किंवा नाटक कंटाळवाणं कधी होतं? जेव्हा त्यातील घटना कल्पनेपेक्षा जास्त predictable म्हणजेच अपेक्षित घडतात. उदाहरणार्थ व्हिलन स्वतःची माणसं पाठवून, हिरोईनला त्रास देणार, मग व्हिलन तिला येऊन वाचवणार आणि हिरो बनून पुढे हिरोईनला त्रास देणार! सध्या हाच घटनाक्रम महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळत आहे. त्यात भर विरोधकांनी पोसलेली “पत्रकार” नावाची एककल्ली तुणतुणं वाजवणारी बँड कंपनी. सर्वसामान्य लोकांच्या अज्ञानाच्या पातळीबद्दल तर न बोललेलंच बरं कारण बातम्यात सांगितलं जातं ते सगळं सत्य असतं, या “दूरदर्शनच्या काळातून” लोक बाहेर यायला तयार नाहीत! साधारणपणे २०१४ पासून, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सत्तेत आले की एक गोष्ट अगदी निसर्गाच्या नियमानुसार घडते ती म्हणजे आंदोलनांचे सत्र. गेल्या काही वर्षात विरोधकांनी आपल्या राजकारणाचा एक भाग म्हणून आंदोलनांचा “वापर” केलेला दिसून येत आहे. सगळं काही इतकं predictable झालेलं आहे की, विरोधकांचे हे “आंदोलनास्त्र” कंटाळवाणे होत चाललेले आहे.
तरीही, प्रश्न उपस्थित केला की त्याला उत्तर मिळालंच पाहिजे ही अपेक्षा एका माणसाकडून कायम केली जाते. तो माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस. माझ्या माहितीनुसार मराठी पत्रकार त्यांच्याइतके कुणालाच जाब विचारत नाहीत. कदाचित त्यांनाही बाकी कुणाकडून (अगदी त्यांच्या पालनकर्त्यांकडून) अपेक्षा नसाव्यात. आणि विशेष गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस या माणसाकडे कायम या आंदोलनास्त्राचे अचूक उत्तर असते. हे कसं? हा एक मोठा प्रश्न आहे ज्याच्यावर थोडे चिंतन करणे गरजेचे आहे. मला विचारलं तर याला एक सोपे उत्तर आहे. हे उत्तर तितकेसे सरळसोट नाही.
देवेंद्र फडणवीस आणि विश्वास
काळ, वेळ, स्थळ, राजकीय परिस्थिती आणि गरज यांच्यानुसार उत्तर शोधले जाते. या सगळ्यांच्या मुळाशी “संवाद” असतो. काहींना संवाद शब्द वाचून विशेष काही वाटणार नाही. पण, वाद आणि संवाद यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. वाद कोणत्याही परिणामाची अपेक्षा ठेवून केला जात नाही आणि संवाद हा कायम प्रश्नांचे समाधान शोधण्यासाठी साधला जातो. थोडक्यात फरक लक्षात घ्यायचा असेल तर मविआ च्या काळातील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे योग्य मागण्यांसाठी झालेले आंदोलन आठवा. त्या काळात, त्या वेळच्या सरकारातील कोणीही, सरकार बाहेरून चालवणाऱ्या कोणीही, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला नाही. उलट त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना बोलावले, त्यांच्यावर खटले दाखल केले, लाठीमार झाले, कर्मचाऱ्यांवर आरोप केले गेले आणि सगळ्यात दुर्दैवी म्हणजे ज्यांनी पगारा अभावी आत्यंतिक पाऊल उचलले त्यांच्यासाठी दोन सहानुभूतीचे शब्द देखील उच्चारले नाहीत! लोक हे सगळं लवकर विसरून जातात म्हणून आठवण करून दिली!
हे सगळे प्रकार देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना झाले असते तर!? विचार करूनसुद्धा अंगावर काटा येतो कारण, न झालेल्या गोष्टींवर देखील जाळपोळ करणारी आपली “पूर्वग्रहदूषित जनता” खरोखर काही झाल्यावर काय करेल/ याबद्दल कल्पना न करणंच बरं! पण देवभाऊ म्हणजेच देवेंद्र सत्तेत आहे म्हणजेच असं काही होणार नाही याची खात्री असते. किंबहुना “देवाभाऊ आहे, तो सगळं ठीक करेल” या विश्वासावर महाराष्ट्रातील जनता शांतपणे आपला दिवस घालवत आहे. हा विश्वास कुठल्या पोकळीत निर्माण झालेला नाही. याच्या मागे इतिहास आहे, कोरेगाव भीमा चे घडवून आणलेले हिंसक आंदोलन असो, नाहीतर वेगवेगळ्या जातींच्या मंडळींनी काढलेले मोर्चे असो, शेतकरी, मजूर, कामगार, शालेय कर्मचारी, व्यापारी, वाहतूकदार, डॉक्टर इंग्रजीत म्हणायचं झालं तर “you name it” आणि मग आजूबाजूला नजर फिरवली तर लक्षात येईल समाजातील प्रत्येक घटकाने (खाजगी नोकरी करणारे सोडून) देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना आंदोलन नाहीतर संप पुकारलेले आहेत, बंद वगैरे केलेले आहेत. प्रश्न खरे असले तरीही, या सगळ्यांनी विरोधकांना बंदूक ठेवण्यासाठी आपला खांदा दिला हे अगदीच उघड आहे.
आंदोलनास्त्राचे प्रत्युत्तर
देवभाऊ, देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक आंदोलनास्त्राला उत्तर दिलेले आहे. याचे सगळ्यात मोठे यश असे की देवेंद्र फडणीस सरकारमध्ये आल्यापासून कोणतेही आंदोलन हल्ली एक दोन दिवसांच्या पुढे टिकत नाही. टिकत नाही म्हणजे विरोधकांना त्याच्या भट्टीत आपली पोळी भाजता येत नाही. कारण त्यांनी धग वाढवण्याआधीच देवेंद्र फडणवीस संवाद सुरू करतात आणि मूळ प्रश्न सोडवतात. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांनाही आपण आपला खांदा विरोधकांना राजकीय बंदुकी ठेवण्यासाठी देत आहोत हे समजत आहे. जर आंदोलन राजकारण म्हणूनच केलेले असेल तर, देवेंद्र फडणवीस राजकारणी आहेत याचा देखील प्रत्यय येतो. भली भली आंदोलने त्यांनी “साम-दाम-दंड-भेद” या चतुःसूत्रीचा अवलंब करून मोडीत काढलेली आहेत. काही काही आंदोलने तर सुरू होण्याआधीच मोडीत निघाली उदाहरणार्थ मध्यंतरी फलद्रुप न झालेले वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन, MPSC परीक्षार्थींचे आंदोलन इत्यादी.
या सगळ्यामुळे हल्ली विरोधक सुद्धा जेरीला आलेले आहेत. “कोणता करावा उपाय?” या विवंचनेत बिचारे डोक्याला हात लावून बसलेले दिसतात. तसेच वारंवार राजकारण्यांच्या मागे लागून विनाकारण आंदोलन करणाऱ्यांचीही आता पंचाईत होऊ लागली आहे. आधी नमूद केल्याप्रमाणे predictable घटनाक्रम कंटाळवाणा असतो. त्यामुळे सध्या लोकांनाही या ऋतुमानासारख्या उगवणाऱ्या आंदोलनांचा कंटाळा येऊ लागलेला आहे. समाजाची सहानुभूती हा आंदोलनांचा प्राणवायू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या “संवाद”शील उत्तरांमुळे आता राजकीय आंदोलनांना, पत्रकारांनी पंप लावून भरायचा प्रयत्न करून देखील हा प्राणवायू मिळत नाही!
दुःख इतकेच आहे की जे घटक स्वतःचा वापर राजकारणासाठी करू देतात त्यांच्याविषयी लोकांची सहानुभूती संपत चाललेली आहे. ज्यामुळे त्यांच्या प्रामाणिक मुद्द्यांना देखील पुरते पाठबळ मिळत नाही. पण याचा विचार, स्वतःचा राजकारणासाठी वापर करू देणाऱ्यांनी केला पाहिजे! खाली महाराष्ट्रात मविआ च्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आकडे देत आहे. मविआच्या काळात ७१६५ दुर्दैवी शेतकरी बंधू भगिनींनी आत्महत्या केल्या, तेव्हा हे मौसमी आंदोलन-जीवी कुठे होते? तुम्हीच आठवून सांगा किती मोर्चे निघाले? किती वेळा शेतकऱ्यांच्या संघटनांनी आंदोलन केले किंवा किमान चिंता व्यक्त केली? किती शेतकरी कामगार संस्थांनी आवाज उठवला? किती माध्यमांनी तत्कालीन मंत्र्यांना प्रश्न विचारले? त्यांना धारेवर धरले? आठवल्यास नक्की सांगा..
काळ | वर्ष | संख्या | संदर्भ |
जानेवारी – डिसेंबर | २०२० | २५४७ | टाईम्स ऑफ इंडिया |
जानेवारी – डिसेंबर | २०२१ | २७४३ | टाईम्स ऑफ इंडिया |
जानेवारी – ऑगस्ट | २०२२ | १८७५ | डेक्कन हेराल्ड |
आत्ताही काही शेतकरी मंडळी राजकारण्यांच्या नादी लागून आपले खांदे त्यांचे राजकारण करण्यासाठी वापरायला देत आहेत. उघडपणे लक्षात येत आहे की हे लोक गेली तीन वर्षे लुप्त झालेले होते. विरोधक आणि डावे शेतकऱ्यांचा वापर करून सोयीची आंदोलने करत आहेत. पटत नसेल तर त्यांच्या आंदोलनांत दिसणारे झेंडे बघा. पण आता त्यांना सहानुभूती मिळणार नाही. कारण कोणतीही खेळी इतकीदेखील सहज समजण्याजोगी predictable असू नये. पण हे त्या शेतकऱ्यांना आणि त्यांचे डोळे झाकून समर्थन करणाऱ्यांना कोण समजावणार?
शेतकरी आणि राजकीय खेळांत त्यांना दिले जाणारे महत्त्व याबद्दल मीमांसा नंतर कधी तरी करू. पण मुद्दा असा आहे की आता विरोधकांनी आपल्या विकृत आणि सत्त्वहीन राजकारणाच्या भात्यातून कुठलेही “आंदोलनास्त्र” उपसले तरीही त्याला “देवेंद्र फडणवीस” नावाचे अचूक प्रत्युत्तर महाराष्ट्राला मिळालेले आहे. “देवाभाऊ आहे तो सगळं ठीक करेल!” याला “देवावर विश्वास ठेवणे म्हणतात”!
1 thought on “सोयीचे “आंदोलनास्त्र” आणि देवेंद्र फडणवीस नावाचे अचूक प्रत्युत्तर”